Mudalagi : मठात आढळले स्वामी आणि महिला, संतप्त ग्रामस्थांचा रोष; महिलेवर गैरवर्तनाचा आरोप
Belagavi : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील अडवीसिद्धेश्वर मठात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मठाचे स्वामी अडवीसिद्धराम एका महिलेसोबत रात्रीच्या वेळेस एका खोलीत आढळून आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी स्वामींना मारहाण करत मठातून बाहेर हाकलले. दरम्यान, जमावातील काही तरुणांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ही घटना 21 जून रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. बागलकोट जिल्ह्यातील तालिकोट येथून एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह मठात आली होती. त्यांनी रात्री मठातच थांबण्याचे ठरवले. मात्र, काही ग्रामस्थांनी रात्री स्वामी अडवीसिद्धराम, ती महिला आणि तिची मुलगी एकाच खोलीत असल्याचे पाहिले.
घटनास्थळी मोठा जमाव जमू लागला. संतप्त ग्रामस्थांनी मठात घुसून स्वामींना जाब विचारला आणि मारहाण केली. त्यांच्यावर हात उचलत कपाळ फोडले. त्यानंतर जमावातील काही व्यक्तींनी महिलेसोबत गैरवर्तन केले, तर तिच्या मुलीचे कपडे फाडल्याचा आणि तिला फरफटत ओढल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत महिला व तिच्या मुलीला सुरक्षितरीत्या बाहेर काढले व समुपदेशनासाठी केंद्रात हलवले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्वामींना मठातून बाहेर काढण्यात आले. सध्या स्वामी अडवीसिद्धराम हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे असल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.