जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही,तो जनतेचा काय होणार? भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जहरी टीका
खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अनेक शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे.
ते बोलताना म्हणाले की, रामदास कदम यांचे सख्ये लहान भाऊ सदानंद कदम यांची काय चूक होती. त्यांचा राजकारणाशी काय संबंध होता. आज त्यांचा लहान भाऊ जेलमध्ये आहे आणि हे इकडे पेढे वाटतात.
जो स्वतःच्या भावाचा होऊ शकत नाही, जो बाळासाहेबांचा कधी झाला नाही, तो जनतेचा काय होणार. असं म्हणत भास्कर जाधवांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, माझा भाचा आणि भाऊ किती लाचार झाले आहेत, अशी खोचक टीका केली. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळत आहे. यावरुनच अंधारेंनी शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य केले.