बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे १८ ते २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
Team Lokshahi

बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे १८ ते २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची काळजीही सातत्याने घेत असते.
Published by :
Team Lokshahi

जुई जाधव |मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची काळजीही सातत्याने घेत असते. याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध लसीकरण मोहिमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येत असते. यानुसार येत्या रविवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२२ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणा-या मोहिमेदरम्यान ५ वर्षे वयाखालील अंदाजे ८ लाख ९० हजार ४२५ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ५ हजार चमू दिवसा कार्यरत राहणार असून, स्थलांतरित-बेघर बालकांच्या लसीकरणाकरीता २४ रात्र चमू कार्यरत राहणार आहेत. तरी मुंबईकर नागरिकांनी व विशेष करुन ५ वर्षे वयाखालील बालकांच्या पालकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, पल्स पोलिओ लसीकरण म्हणजे ५ वर्षे वयाखालील सर्व बालकांना एकाच दिवसात नियमित लसीकरणाव्यतिरिक्त ‘पोलिओचा अतिरिक्त’ डोस पाजणे. केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सन १९९५ पासून विशिष्ट महिन्यातील रविवारी आणि त्यापुढील पाच दिवस घरोघरी जाऊन पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. आपल्या देशात ही मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारत देशास सन २०१४ पासून पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले आहे. परंतु, सन २०२२ मध्ये जगभरातील काही देशांमध्ये १९ पोलिओ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आपल्या देशाशेजारील देश असणा-या पाकिस्तान मध्ये १४, तर अफगाणिस्तान मध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. तसेच मोझांबिक या देशात ४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पोलिओमुक्त झालेल्या देशांनी देखील योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकूण १३४ पल्स पोलिओ लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर येत्या रविवार पासून म्हणजेच दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी लसीकरण बूथवर पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येतील. तसेच त्यानंतर पुढील पाच दिवस पल्स पोलिओच्या दिवशी ज्या बालकांना डोस पाजायचा राहीला असेल, त्यांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकी २ स्वयंसेवकांच्या लसीकरण चमुतर्फे योजनाबद्ध रितीने पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत.

दिनांक १८ सप्टेंबर २०२२ ते दिनांक २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान अंदाजे ८ लाख ९० हजार ४२५ बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओ मात्रा पाजण्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रामार्फत दि. १८ सप्टेंबर २०२२ या रविवारी एकूण ४ हजार ८२१ बूथ कार्यरत राहणार आहेत. तसेच या दिवशी ३२२ ट्रान्झिट चमू विविध रेल्वे स्थानके, उदयाने, विविध पर्यटन स्थळे या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कार्यरत असतील. विविध बांधकाम स्थळांवरील स्थलांतरित बालकांचे लसीकरण करण्यासाठी ४३ चमू दिवसा कार्यरत असतील.

दिनांक १९ सप्टेंबर २०२२ ते दिनांक २३ सप्टेंबर २०२२ या पाच दिवसात पल्स पोलिओ लसीकरण करण्याकरीता घरभेटींसाठी आरोग्य केंद्रामार्फत ४० लाख घरांना भेटी देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५ हजार चमू कार्यरत राहणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयातंर्गत दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी रस्त्यावर राहणा-या स्थलांतरीत बेघर बालकांच्या लसीकरणाकरीता २४ रात्र चमू कार्यरत असणार आहेत. या अनुषंगाने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या ५ वर्षाखालील बालकांना दिनांक १८ सप्टेंबर २०२२ आपल्या जवळील पल्स पोलिओ लसीकरण बूथवर नेऊन पोलिओची अतिरिक्त मात्रा पाजून घ्यावी. तसेच पुढील पाच दिवस सोमवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत घरभेटीस येणा-या आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांना सहकार्य करावे, अशीही विनंती यानिमित्ताने डॉ. गोमारे यांनी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे १८ ते २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
LOKशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; पुण्यातील सेक्स तंत्र शिबीर झालं रद्द
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com