डोंबिवलीत केबल व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल
अमजद खान । कल्याण: केबल व्यवसायात होत असलेल्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रल्हाद पाटील या व्यावसायिकांने व्हीडीओ तयार करून आणि सूसाईड नोट लिहिली आहे. या प्रकरणी ठाणे जीआरपीने आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पंधरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.
दोन दिवसांपूर्वी दिवा पनवेल मार्गावरली दातिवली आणि निळेज रेल्वे स्थानका दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर प्रल्हाद पाटील नावाच्या 44 वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील याने त्याच्यासोबत होत असलेल्या मानसिक छळाविषयी एक व्हीडीओ तयार केला होतो. ज्यामध्ये त्याने त्याच्यासोबत होत असलेल्या छळाची व्यथा मांडली आहे.
केबल व्यावसायात कशा प्रकारे त्याला छळले जात आहे. काही स्थानिक लोक त्याच्या जीवावर उठले आहेत. या प्रकरणात ठाणो जीआरपीने तपास सुरु केला. या बाबत ठाणो जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 15 आरोपी आहेत. संदीप गोपीनाथ माळी, कुंदन गोपीनाथ माळी, संदीप पाटील, रणदीप पाटील, हेमंत पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, तृप्ती पाटील, प्रथमेश पाटील, मधूकर पाटील, दत्तात्रय पाटील, प्रवीण पाटील, हर्षल पाटील, ऋतिक पाटील, आस्तीक पाटील अशी आरोपींची नावे आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल असे कांदे यांनी सांगितले. प्रल्हाद पाटील यांचा कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणात दोषींवर ठोस कारवाईची मागणी केली आहे.