जिल्हाधिकारी एक्शन मोडवर; अवैधरित्या दोन स्टोन क्रशर सील,जामठा येथील खदानीवर पथकाची धाड

जिल्हाधिकारी एक्शन मोडवर; अवैधरित्या दोन स्टोन क्रशर सील,जामठा येथील खदानीवर पथकाची धाड

तालुक्यातील जामठा येथे अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या खदानीवर धाड टाकून कारवाई करण्यात आली.
Published by :
shweta walge

भूपेश बारंगे, वर्धा: तालुक्यातील जामठा येथे अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या खदानीवर धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत आढळून आलेले दोन स्टोन क्रशर जप्त करण्यात आले असून दोन वाहने व एक पोकलॅंड जमा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेप्रमाणे गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पथकाने ही कार्यवाही केली.वर्ध्यात पोलीस अधीक्षकानंतर जिल्हाधिकारी आता ऍक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॅा.अतुल दौड यांच्यासह तहसिलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवालाच्या पथकाने ही कार्यवाही केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूकीस आळा घालण्यासाठी आकस्मिक पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाच्या पहिल्याच धाडीत ही कारवाई करण्यात आली. जामठी येथील या खदानीचा साठा व विक्री परवान्याची मुदत संपुष्टात आली होती. असे असतांना देखील अवैधरित्या उत्खनन करून स्टोन क्रशर चालविण्यात येत होते. पथकाच्या धाडीत ही बाब समोर आल्याने कारवाई करण्यात आली.

खान परिसरात अवैधरीत्या वाहतूक करताना दोन वाहने व एक पोकलेन आढळून आला. दोन वाहनांसाठी ४ लाख तर पोकलेनसाठी ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. सदर दंडाची ११ लाख ५० हजार ईतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. तसेच अवैधरित्या कार्यरत दोन स्टोन क्रशर देखील सील करण्यात आले आहे.

खदान परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धाड टाकण्यात आलेल्या जामठा येथील या खदान परिसराची पाहणी केली. जिल्हास्तरीय पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती त्यांनी जाणून घेतली. अवैधरित्या उत्खनन झालेल्या क्षेत्राचे ईटीएस मशिनद्वारे मोजमाप करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अवैध उत्खननाचे परिमाण निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. जामठा खदान क्षेत्रावर यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

खदान परिसरांना सुरक्षा कुंपन

उत्खननाची परवाणगी असलेल्या खदान परिसरात मोठ्या प्रमाणात दगड गोट्यांचे उत्खनन केले जाते. त्यामुळे याठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व खदानींना तारेचे कुंपण करून घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी एक्शन मोडवर; अवैधरित्या दोन स्टोन क्रशर सील,जामठा येथील खदानीवर पथकाची धाड
डॉ.पूर्वप्रभा पाटील या कोकणकन्येने केले  इजिप्तमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com