धनंजय मुंडे यांची ७वी आणि ८वी बरगडी फ्रॅक्चर; अजित पवारांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात झाला आहे. चालकाच वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असून अपघातात धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. या दुखापतीनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, ब्रिच कॅंडी रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याबाबत मी सकाळ आणि संध्याकाळी डॅाक्टरांसोबत चर्चा करत आहे. त्यांना विश्रांतीची गरज असून त्यांना भेटायला जाण्यासाठी कोणीही गर्दी करू नये. धनंजय मुंडे यांना पाच ते सहा दिवस रुग्णालयात विश्रांती करावी लागणार आहे. मी डॅाक्टरांना सांगितले की, त्यांना जेवढे दिवस रुग्णालयात ठेवायचे तेवढे दिवस रुग्णालयात ठेवा. पण कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये.
दरम्यान, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये” अशी धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.