Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून जेठालाल आणि बबीता मालिका सोडणार? असित मोदींचा खुलासा
प्रसिद्ध विनोदी मालिकेतील लोकप्रिय पात्रे जेठालाल आणि बबीता यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडली असल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आलं आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
गेल्या काही भागांमध्ये मालिकेतील भूतनीच्या कथानकात जेठालाल आणि बबीता हे प्रमुख पात्रे दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी मालिका सोडली असल्याचा अंदाज अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे. जेठालाल हे पात्र अभिनेता दिलीप जोशी यांनी, तर बबीता हे पात्र मुनमुन दत्ता यांनी साकारले आहे. या पार्श्वभूमीवर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एक मुलाखत देत या चर्चांवर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “दिलीप जोशी आणि मुनमुनदत्ता हे आमच्या टीमचा भाग आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळे ते त्या भागांमध्ये दिसले नाहीत.”
त्यांनी सोशल मीडियावरील नकारात्मकतेबाबतही चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, "तारक मेहता का उल्टा चष्मा ही एक सकारात्मक आणि कुटुंबवत्सल मालिका आहे. त्यामुळे प्रेक्षकांनीही या मालिकेबाबत सकारात्मक विचार ठेवावा. छोट्या गोष्टींवरून अफवा पसरवणे योग्य नाही." त्यामुळे, दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांनी मालिका सोडल्याची सध्या फक्त चर्चा सुरू आहे, याबाबत कोणतीही अंतिम माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.