Prashant Damle : अमेरिकेतील 'या' विशेष पुरस्काराने प्रशांत दामले यांचा होणार सन्मान; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
मराठी रंगभूमीचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे, संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे हरहुन्नरी कलाकार, निर्माते प्रशांत दामले त्यांच्या अफाट अभिनय कौशल्याने, नाटकातील सातत्याने आणि प्रेक्षकांशी निर्माण झालेल्या नात्याने ते गेली चार दशके मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या यात कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने 'हृदयसम्राट' हा पुरस्कार देण्याचे जाहीर केलं आहे. प्रशांत दामले यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट करीत या पुरस्कारासंदर्भात माहिती दिली. तसेच आयुष्यातील आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशांत दामले यांच्या कारकिर्दीवर एक नजर
प्रशांत दामले यांनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकातून आपली व्यावसायिक रंगभूमी कारकिर्द सुरू केली. त्यानंतर 'ब्रह्मचारी', 'गेला माधव कुणीकडे', 'एका लग्नाची गोष्ट', 'लेकुरे उदंड झाली' अशा लोकप्रिय नाटकांमधून त्यांनी अभिनयाची जादू पेरली. आजवर त्यांनी 13 हजारांपेक्षा जास्त प्रयोगांची अफाट कामगिरी केली असून, एकाच दिवशी तीन प्रयोग करणे, विविध देशांमधून नाटक सादर करणे हे विक्रम त्यांच्या नावावर कोरले गेले आहेत.
स्वतःची ओळख ‘प्रेक्षकशरण नट’ म्हणून त्यांनी अभिमानाने मांडली आहे. त्यांनी नुसतं हसवलं नाही, तर प्रत्येक नाटकातून काहीतरी सकारात्मक संदेशही दिला. 'साखर खाल्लेला माणूस' सारख्या नाटकातून मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण केली. तर 'एका लग्नाची गोष्ट' मधून स्त्रियांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. नाटक हे फक्त करमणुकीचं साधन नसून, ते विचार जागवणाऱ्या माध्यमाचं रूप त्याला त्यांनी दिलं.
अभिनयाच्या जोडीला त्यांची माणूस म्हणून असलेली जाण विशेष ठरते. कोव्हिड काळात त्यांनी आपल्या टीममधील कर्मचाऱ्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना आधार दिला. त्यांच्या स्वभावातील संवेदनशीलतेचं दर्शन मे 2013 मधील हृदयविकाराच्या झटक्यानंतरही घडलं. जेव्हा त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना आपल्या मुलीला "पाच मिनिटांत आलो गं" असं सांगितलं.
1985 मध्ये लग्नानंतर त्यांनी रंगभूमीस पूर्ण वेळ दिला. पत्नी गौरीच्या साथीने आणि त्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी बेस्टमधील नोकरी सोडून रंगभूमीची निष्ठा जपली. पुढे निर्मात्याची भूमिका घेत 'तिकिटालय' सारख्या उपक्रमातून मराठी नाटकाला नवसंजीवनी दिली. प्रशांत दामले यांचे नाटक, मालिका आणि चित्रपट यांमधील योगदान, त्यांचा हसतमुख चेहरा, संयमित अभिनय, आणि विनोदाचा मनमोकळा प्रवाह यामुळेच ते लाखो प्रेक्षकांच्या मनात 'हृदयसम्राट' ठरले आहेत.
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने ‘हृदयसम्राट’ या सन्मानाने गौरवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.