FATF On Pahalgam Terror Attack : 'पैशांच्या हस्तांतरणाच्या साधनांशिवाय हल्ले अशक्य'; FATF चं स्पष्ट मत, दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
भारतातील काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या 22 एप्रिल रोजीच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजवली. देशासह परदेशातूनही या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. परिणामी, भारतानेही या हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंदून मिशन राबवून दिले. भारताने दहशतवादविरोधी भूमिका जगासमोरदेखील मांडली. दरम्यान, आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (Financial Action Task Force) (FATF) ची प्रतिक्रिया समोर आली आहे. एफएटीएफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला असून दहशतवादी समर्थकांमध्ये पैशांशिवाय आणि पैशांच्या हस्तांतरणाच्या साधनांशिवाय हे हल्ले होऊ शकत नाहीत, असं मत नोंदवल आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पर्यटक जखमी झाले होते. या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला करत जोरदार प्रत्युत्तर दिले.
काय काम करतं FATF
FATF अर्थात Financial Action Task Force या संस्थेला जगभरात दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर नजर ठेवणारी संस्था म्हणून ओळखलं जातं.
ही संस्था एक अशी यंत्रणा नियंत्रित करते, ज्याद्वारे जगभरात अव्याहतपणे वाहणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्यापासून रोखला जातो.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक गैरव्यवहार, दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला असणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व बाबींवर ही संस्था नजर ठेवून असते.
देशांसाठी आवश्यक ते नियम, मार्गदर्शक सूची आणि अंमलबजावणीचे निर्देश या संस्थेमार्फत नमूद केले जातात.
FATF ही ‘ग्रे लिस्ट’ तयार करते.
जे देश आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहार रोखण्यात सातत्याने अपयशी ठरतात, दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखू शकत नाहीत आणि त्यामुळेच जागतिक स्तरावर सातत्याने टीकेचे धनी ठरतात, अशा देशांचा या यादीत समावेश केला जातो.