Mohammad Ghaus
Mohammad GhausTeam Lokshahi

कोल्हापूरचे माजी महापौर महंमदगौस उर्फ बाबू हारुण फरास यांचे निधन

गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

सतेज औंधकर | कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी महापौर महंमदगौस उर्फ बाबू हारुण फरास यांचे रविवारी (ता.१८ सप्टेंबर ) निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७० वर्षाचे होते. महापालिका सभागृहात छाप पाडणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जनमानसात ओळख कायम राहिली.

Mohammad Ghaus
Pune Breaking: शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

महापालिकेत तीन वेळा निवडून येत बाबू फरास यांनी नगरसेवक, शिक्षण समिती सदस्य, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता ते महापौर अशी विविध पदे भूषविली. २५डिसेंबर १९५२ रोजी जन्मलेले बाबू फरास हे वयाच्या २६ व्या वर्षी नगरसेवक झाले.महापालिका अस्तित्वात आल्यानंतर १९७८ ते १९८४ या सभागृहात पहिल्यांदा निवडून आले. समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभलेल्या बाबू फरास यांनी नगरसेवक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. १९९५ ते २००० या कालावधीतील सभागृहात ते विरोधी बाकावरील सदस्य होते. सोबत १८ सदस्य असताना त्यांनी १९९९ मध्ये महापौरपदाची निवडणूक लढविली. महापौरपदाच्या निवडणुकीत फरास यांना ३८ तर ताराराणी आघाडीचे उमेदवार नंदकुमार वळंजू यांना ३३ मते मिळाली. सभागृहात बहुमत ताराराणी आघाडीचे आणि महापौर विरोधी आघाडीचा झाला. यामुळे फरास यांना बिन आवाजाचा बाँम्ब फोडणारा महापौर म्हणून ओळखले गेले.

महापौरपदाच्या त्या निवडणुकीत शिवसेनेने फरास यांना पाठिंबा दिला होता. भाजपाचे दोन सदस्यांनीही फरास यांना मतदान केले. या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद फरास यांना मिळाला.

१७ नोव्हेंबर १९९९ ते १७ नोव्हेंबर २००० असा त्यांच्या महापौरपदाचा कालावधी होते. बाबू फरास यांचे वडील हारुण फरास हे माजी उपनगराध्यक्ष होते.शेतकरी कामगार पक्षाची मुलूख मैदान तोफ अशी हारुण फरास यांची ओळख होती.

बाबू फरास यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवातही शेकाप व डाव्या चळवळीतून झाली. पुढे धडाडीचे नगरसेवक म्हणून ते ओळखले गेले. फरास कुटुंबीयांची तिसरी पिढी आता राजकारण व समाजकारणात सक्रि आहे. बाबू फरास यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी हसीना फरास या महापौर झाल्या. मुलगा आदिल फरास यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधीत्व केले.

Lokshahi
www.lokshahi.com