कोळकेवाडी येथील एका शेतकऱ्याचे चार गुरे लम्पि आजाराने दगावली
Team Lokshahi

कोळकेवाडी येथील एका शेतकऱ्याचे चार गुरे लम्पि आजाराने दगावली

पशुसंवर्धन विभागाची सखोल चौकशी करावी- रमेश राणे
Published by :
shweta walge

निसार शेख,चिपळूण: शिरगाव- लम्पी चर्मरोगावर कोणतेही प्रभावी औषध पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध नसल्याने आपल्या मालकीची तब्बल चार जनावरे दगावल्याचा आरोप कोळकेवाडी येथील शेतकरी सुरेश नाना राणे यांनी केला आहे. या लम्पीने त्यांच्या गोठ्यातील एक जर्सी गाय, एक गावठी गाय, एक गावठी बैल आणि आता बैलगाडा शर्यतीसाठी धावणारा खिल्लार खोंड जातीचा बैलाचाही बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे राणे कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने श्री. राणे यांनी प्रचंड संताप व्यक्त करीत आमदार शेखर निकम यांच्याकडे तक्रार केली आहे. तर माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे यांनी पशुसंवर्धन विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यात हाहाकार माजविणाऱ्या लम्पी चर्मरोगाने चिपळुणातही शिरकाव करीत सुमारे दहा जनावरांचा बळी घेतला आहे. सुरूवातीच्या काळापासून रत्नागिरीच्या पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाव्यतिरिक्त कोणत्याही उपाययोजना व जनजागृती न केल्याने लम्पी आजाराबाबतची परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. काह ठिकाणी लम्पी सदृश जनावरे आढळूनही पशुसंवर्धन विभागाकडे प्रभावी औषध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. यातच रत्नागिरी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. धनंजय जगदाळे यांनी कोणतीच नियोजनाची बैठक घेतली नसल्याची माहिती कोळकेवाडी येथील शेतकरी सुरेश राणे यांनी दिली. लम्पी आजार सुरू झाल्यानंतर लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले. कोळकेवाडीत लसीकरण केल्यानंतर गावातील अनेक जनावरे या आजाराने आजारी पडली आहेत. दगावली सुद्धा आहेत. सुरेश राणे यांच्या गोठ्यामध्ये 23 नोव्हेंबर 2022 रोजी लसीकरण करण्यात आले व दि. 25 नोव्हेंबर रोजीपासून लम्पी आजाराची लक्षणे सुरू झाली. यामध्ये श्री. राणे यांची एक जर्सी गाय, गावठी गाय, एक गावठी बैल व खिल्लार खोंड बळी गेला आहे. अजून काही जनावरे आजारी आहेत. अशावेळी डॉ. जगदाळे यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्यास वेळ नाही. तसेच कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध करून दिले नाही, असे श्री. राणे यांचे म्हणणे आहे. डॉ. सुधीर कानसे यांनाही संपर्क केल्यानंतर येण्यास वेळ नव्हता. ऑफिसमध्ये डॉक्टरांचे पगार बिल करत होते. ज्यावेळेस पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश राणे यांनी संपर्क केल्यानंतर एक वेळ भेट दिली व डॉ. कांबळे यांना औषधांचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सरकारी दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर मागतील ती औषधे श्री. सुरेश राणे यांनी गेली 22 दिवस उपलब्ध करून दिली. एवढे उपाय करून सुद्धा पशुधन वाचू शकले नाही. याची संपूर्ण माहिती श्री. राणे यांनी आ. शेखर निकम यांना दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रांत कार्यालयात बैठक घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यामध्ये उच्च प्रतीची औषधे व योग्य नियोजन करून लम्पी आजार थांबवण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.

कोळकेवाडी येथील एका शेतकऱ्याचे चार गुरे लम्पि आजाराने दगावली
ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रिया पूर्ण, उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मात्र याची कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे गोठे रिकामे होत असल्याची खंत आणि भीती श्री. राणे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित पशुसंवर्धन विभागाची सखोल चौकशी करावी अशी मागणी रमेश राणे यांनी आ. निकम यांच्याकडे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com