Gold Rate : सोन्यानं पार केला एक लाखांचा टप्पा; सोन्याच्या दरात 3 दिवसात तब्बल 1600 रुपयांनी वाढ
सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठला असून आजचा सोन्याचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 3 हजारांच्या भावात पोहोचल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सोन्याने आता एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे. सोन्याच्या दरात 3 दिवसांमध्ये तब्बल 1600 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जीएसटीसह सोन्याचा भाव हा 1 लाख 3 हजारांवर पोहोचला असून सर्वसामान्य जनता या दरामुळे हवालदिल झालेली पाहायला मिळत आहे. तर सोन्याबरोबरच चांदीच्या दरामध्येसुद्धा वाढ होऊन तिचा दर 1 लाख 14 हजार रुपये इतका झालेला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक सध्या वाट पाहत असल्याचे चित्र आहे.
सराफा बाजारात आज पुन्हा सोन्याच्या भावाने नवी उंची गाठली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता गळती लागणार हे निश्चित आहे. डॉलरच्या मानाने रुपयाची किंमत, इम्पोर्ट ड्युटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या मागणीत सध्या वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जागतिक स्तरावरची आर्थिक अस्थिरता, चलनवाढ, आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला वाढता कल यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर टेरिफमुळे सोन्याच्या भावात जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 22 देशांपेक्षा जास्त देशांना या टेरिफाईडचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
मात्र टेरिफ रेटमुळे आणि इतर जागतिक स्तरावरील घडामोडींचा सोन्याच्या दरवाढीवर परिणाम होत असून येणाऱ्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे.