Gunaratna Sadavarte : 'लहान मुलांच्या शाळांवरून राजकारण सुरू केलंय'; गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चाला अधिवक्ता गुणरत्न सदावर्तेंनी तीव्र विरोध दर्शवला आहे. "राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप त्यांनी केला आहे. सदावर्ते म्हणाले की, या मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरे काहीतरी भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होणे आवश्यक आहे. "त्यांना मोर्चासाठी परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायला हवे," अशी मागणीही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, "तीन भाषांबाबतची जी धोरणं आहेत, ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणली गेली होती. त्यामुळे आधी उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी, मग इतरांवर बोट ठेवावे. दुसऱ्यावर बोट ठेवताना लक्षात ठेवा, चार बोटं तुमच्याकडेच असतात." सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना विचारले, "भाई भाई आहेत ना?, मग त्यावेळी भाऊ म्हणून आवाज का उठवला नाही?, तेव्हा कंठात दम नव्हता का?, आता मात्र लहान मुलांच्या शाळांवरून राजकारण सुरू केलंय!" ते म्हणाले, "16 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मुलं हिंदी शिकत आहेत, पालकही त्यात रस घेत आहेत. यात सरकारचा काही दोष नाही."
शेवटी सदावर्तेंना टोला लगावत संजय राऊत म्हणाले की, "गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचे पाळीव आहेत, अशी माझी माहिती आहे. त्या पोपटांकडे फारसं लक्ष देऊ नका.