राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट
महाराष्ट्रात पावसाने जोर वाढवला आहे. नदी - नाले तुडुंब भरले आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर भंडाऱ्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.