Himachal Pradesh : मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटी; व्हिडीओ आला समोर
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटीची (Cloudburst) घटना घडली आहे. ढगफुटीमुळे मणिकर्ण खोऱ्यातील गावांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे समजत आहे. ढगफुटीमुळे गावातील 3 घरे आणि 2 कॅम्पिंग साईट वाहून गेल्या असून 40 जण बेपत्ता झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात आज सकाळी ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे अनेक लोक बेपत्ता झाले. ढगफुटीमुळे कुल्लू जिल्ह्यातील मलाना आणि मणिकर्णचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून बचावकार्य सुरू आहे. ढगफुटीमुळे कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यात अचानक पूर आल्याची माहिती आहे. कुल्लूच्या चोझ गावात गुरांसह चार लोक वाहून गेले. गावाकडे जाणारा एकमेव पुलालही ढगफुटीचा तडाखा बसल्याने प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील सहा जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय कुल्लू येथील मलाना पॉवर प्रोजेक्ट २ च्या धरणाच्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाच्या इमारतीचेही ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बचाव पथकाने 25 हून अधिक लोकांना या इमारतीतून सुखरूप बाहेर काढले आहे.
शिमला येथे भूस्खलनात झाले असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृत हे स्थलांतरित कामगार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जखमींना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही वाहनेही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. रस्त्यांवर दरड कोसळल्याने बचाव पथकही मध्येच अडकले आहे.