Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेत 270 जणांचा मृत्यू, 31 मृतदेहांची ओळख डीएनएद्वारे; आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

भारतातून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा गुरुवारी दुपारी अहमदाबादजवळ भीषण अपघात झाला.
Published by :
Team Lokshahi

भारतातून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा गुरुवारी दुपारी अहमदाबादजवळ भीषण अपघात झाला. त्यात आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने देशभरात हळहळ व्यक्त होत असून, सध्या मृतदेह ओळख आणि ताबा प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. घटनास्थळीच अनेकांचे मृतदेह विखुरले गेले होते. त्यामुळे डीएनए प्रोफाइलिंगद्वारे ओळख पटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मृतांचा आकडा वाढला

या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी बचावला. उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विमान ज्या इमारतीवर कोसळले तेथील 29 जणांचाही घटनास्थळी मृत्यू झाला असून त्यात 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण मृतांचा आकडा 270 वर पोहोचला आहे.

डीएनए प्रोफाइलिंगद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू

शुक्रवार ते शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत 31 मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. यामध्ये 12 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मदत आयुक्त आलोक कुमार पांडे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी ही माहिती दिली.

कायद्याच्या औपचारिकता पूर्ण केल्यावरच मृतदेह सुपूर्द

नातेवाईकांची ओळख पटवल्यानंतरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी, 8 मृतदेहांचे स्वरूप ओळखण्याजोगे असल्याने, त्यांना डीएनए चाचणीशिवायच नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले.

माजी मुख्यमंत्र्याच्या मृतदेहाचीही प्रतीक्षा

या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. परंतु त्यांच्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. डॉ. पटेल यांनी स्पष्ट केले की, ओळख पटताच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल. सध्या डीएनए नमुने जुळवण्याचे काम सुरू आहे. दर दोन तासाला मेडिकल बुलेटीन देण्यात येईल, अशी माहिती डॉ. पटेल यांनी दिली

राज्य व केंद्र सरकारची संयुक्त चौकशी

अपघाताची चौकशी राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त पथकाद्वारे सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाड किंवा संभाव्य मानवी चूक या दिशेने तपास सुरू आहे. हवाई अपघात प्राधिकरण आणि नागरी उड्डाण मंत्रालय देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून, अनेक जण मृत प्रियजनांच्या ओळखीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने मनोवैज्ञानिक मदत, निवास व्यवस्था आणि समुपदेशन सुरू केले आहे. शवविच्छेदनासाठी विशेष पथक राबवले जात असून शासन अधिकतम पारदर्शकता राखून काम करत आहे.

हेही वाचा

Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेत 270 जणांचा मृत्यू, 31 मृतदेहांची ओळख डीएनएद्वारे; आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
Iran - Israel Conflict News : इस्त्रायल-इराणमध्ये युद्धाचा भडका, कोणत्या देशाचा कोणाला पाठिंबा?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com