लखीमपूर खिरी गावातील दलित मुलीच्या हत्येच्या अमानुष गुन्ह्याची सखोल चौकशी करावी - रामदास आठवले
जुई जाधव, मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी गावातील दलित समाजाच्या दोन अल्पवयीन बहिणींची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा अमानुष प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे. या अमानुष गुन्ह्याची सखोल संपूर्ण चौकशी करून आरोपीनां कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
या गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रकरणाबाबत आज त्वरित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी आपण दूरध्वनी द्वारे बोलणार आहोत अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
लखीमपूर खिरीतील सामूहिक अत्याचारात बळी गेलेल्या दलित मुली या सख्ख्या बहिणी आणि अल्पवयीन होत्या. त्यातील लहान मुलगी सातवी आणि मोठी दहावी इयत्तेत शिकणाऱ्या होत्या. त्यांची सामूहिक अत्याचार करून हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगण्यात आले होते. हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दलित्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी एट्रोसिटी ऍक्टची तंतोतंत अंमलबाजवणी झाली पाहिजे. पीडित मुलींच्या कुटुंबियांना अट्रोसिटी ऍक्ट नुसार सांत्वनपर निधी राज्यशासनाने द्यावा. तसेच पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य शासनाने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.