Madhya Pradesh Crime : आपल्या बायकोचे दुसऱ्यासोबत लग्न लावले; दोघांनी मिळून नवरदेवाला लुटले , नेमकं प्रकरण काय?
Jabalpur Crime News : जबलपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध कथाकार अनिरुद्ध आचार्य यांच्या एका अनुयायाचा खून झाला आहे. इंदू कुमार तिवारी असे त्याचे नाव आहे. त्याने आपण विवाहाइच्छुक असून आपल्याकडे खूप संपत्ती आहे हे सांगितल्यामुळे हा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १४ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रसिद्ध कथाकार अनिरुद्ध आचार्य यांच्या एका प्रवचनात ४५ वर्षीय इंदू कुमार तिवारी नामक इसम सहभागी झाला होता. त्याने त्यांच्या प्रवचनामध्ये आपण अविवाहित असून आपल्याला लग्न करण्याची इच्छा आहे. तसेच त्याच्याकडे खूप संपत्ती आहे हे सुद्धा त्याने सांगितले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ गोरखपूरच्या पतिपत्नी असलेल्या ख़ुशी आणि कौशल या दाम्पत्याने पहिला. त्यानुसार त्यांनी इंदू कुमार तिवारी याची संपत्ती हडपण्याचा कट रचला. त्याप्रमाणे इंदू कुमार तिवारी याच्याशी कौशल गौर याने संपर्क साधून माझी बहीण सुद्धा विवाहासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
मात्र प्रत्यक्षात कौशलने आपल्या पत्नीलाच इंदू कुमार तिवारी याची बायको बनवण्याचा प्लॅन केला. खुशी आणि इंदू कुमार तिवारी यांच्यात बोलणे चालू झाले. त्या दाम्पत्याने मोठ्या हुशारीने इंदू कुमार तिवारी याचा विश्वास संपादन केला. प्लॅनप्रमाणे ५ जून रोजी गोरखपूरला लग्न करण्याचे ठरवले. त्यानुसार लग्न सुद्धा झाले. आनंदी असलेल्या इंदू कुमार तिवारी याने आपल्या लग्नाचे फोटो आपल्या गावातील नातेवाईकांना पाठवले. मात्र दुसऱ्या दिवसापासून इंदू कुमार तिवारी याचा मोबाईल बंद येऊ लागला. यामुळे गावकऱ्यांनी याबाबत पोलिसस्टेशनला तक्रार नोंदवली. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असताना त्यांना गोरखपूरमध्ये एका मृतदेहाची माहिती मिळाली आहे. त्याबाबत अधिक चौकशी केली असता तो मृतदेह इंदू कुमार तिवारी याचा असल्याचे निष्पन्न झाले.
ख़ुशी आणि कौशल या दाम्पत्याने इंदू कुमार तिवारी याच्याशी खोट्या लग्नाचे नाटक करून त्याची सर्व संपत्ती, सोने, पैसे घेऊन पळून जाण्याचा कट रचला होता. याबाबत इंदू कुमार तिवारी याला समजले त्यामुळे त्यांनी त्याचा जीव घेतला. याप्रकरणी ख़ुशी आणि कौशल यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे