Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँकांच्या संयुक्त विद्यमाने 'अर्ज द्या, कर्ज घ्या' ही विशेष मोहीम राबवली जात आहे. 3 ते 10 जुलै दरम्यान 375 गावांमध्ये ही मोहीम राबवली जात असून शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर नजीकच्या चित्ते पिंपळगाव येथे झालेल्या कर्ज मेळाव्यास भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक कर्ज त्वरित मंजूर करण्याचे निर्देश बँकांना दिले. खरीप हंगामाला सुरुवात झालेली असताना शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक पाठबळ मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे यंदाचे उद्दिष्ट 1,596.63 कोटी इतके ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 93,102 शेतकऱ्यांना 730 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विशेष अभियानातच 6,405 शेतकऱ्यांना 59.30 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण अद्याप बाकी आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी शेतकऱ्यांना जुने पीक कर्ज लवकरात लवकर नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून नवीन हंगामासाठी त्यांना आर्थिक अडचणी येणार नाहीत.
चित्ते पिंपळगाव येथे झालेल्या कर्ज मेळाव्यात चित्ते पिंपळगावचे सरपंच पांडुरंग सोनोने, चित्तेगावच्या सरपंच सरला गावंडे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, तहसीलदार कैलास वाघमारे यांच्यासह बँक अधिकारी आणि अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली.
या विशेष मोहिमेमुळे शेतकऱ्यांना गावातच कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली असून त्यांना बँकेत अनेकदा हेलपाटे टाळता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील तयारीला चालना मिळत असून आर्थिक बळकटी प्राप्त होत आहे.
आगामी काळात उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर पीक कर्ज वितरित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँका प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.