भ्रम निर्माण करण्याचा भाजपकडून अश्लाघ्य प्रयत्न; अरविंद सावंतांची कडाडून टीका

भ्रम निर्माण करण्याचा भाजपकडून अश्लाघ्य प्रयत्न; अरविंद सावंतांची कडाडून टीका

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने बाद ठरवली आहेत. प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्यानं ती बाद ठरवण्यात आली.

मुंबई : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने बाद ठरवली आहेत. प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्यानं ती बाद ठरवण्यात आली असल्याच्या बातम्या बुधवारी माध्यमांवर फिरत होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक आयोगाचे कार्यालय ४ दिवस बंद आहे. प्रतिज्ञापत्र तपासणी व्हायची आहे. परंतु, त्याआधीच भाजप भ्रम पसरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाचे कार्यालय ४ दिवस बंद आहे. साडेआठ लाख सदस्य नोंदणीचे फॉर्म दिले आहेत. प्रतिज्ञापत्रांची तपासणी अजून व्हायची आहे. ती लाखांच्या घरात गेली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संदर्भ चुकीचे देत आहेत.

भाजपकडून जाणीवपूर्वक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसे ईडी, न्यायालय उद्या काय निर्णय घेणारे हे ते आधीच सांगतात. त्याचप्रकारे निवडणूक आयोगाची भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने वेळीच सावध व्हावे. आणि किती धादांत खोटे बोलत आहेत हे पाहावे. ईडी कार्यालय बंद असतानाही अशा प्रकारच्या बातम्या पसरवून भाजप नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहे. संविधानावर घाव घालण्याचे काम भाजप करत आहे, अशी जोरदान टीका केली,

काय आहे प्रकरण?

शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यावरुन उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने आले आहेत. हा संघर्ष सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आयोगानुसार शिंदे- ठाकरे गटाने पक्ष सदस्यात्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, ठाकरे गटांची अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठवण्यात आली आहेत. ठाकरे गटाने जवळपास 11 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर केली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्यानं निवडणूक आयोगाने रद्द ठरवली आहेत. तर, उर्वरीत साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र वैध ठरवली आहेत. यामुळे ठाकरे गट अडचणीत आला असून याचा शिंदे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे, असे वृत्त होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com