भाजपचं टेन्शन वाढलं! बच्च कडूंचा राणांच्या जागेवर दावा
सूरज दाहाट | अमरावती : अमरावती लोकसभा निवडणुकीच्या जागेवर आमदार बच्चू कडू यांनी दावा केला आहे. तर, अमरावती जागेवर नवनीत राणा सध्या खासदार असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे जागा वाटपावरून महायुतीत आता वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात विधानसभेच्या 15 जागा लढवणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.
अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहार उमेदवार देणार आहे. मी स्वतः अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो होतो. तेव्हा कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता आणि त्यात आम्ही फक्त पाच हजार मतांनी पडलो होते. आता बऱ्यापैकी आम्ही तयारी केलेली आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर आम्ही राजकीय ताकद बऱ्यापैकी निर्माण केली आहे. आणि ते सोबत घेऊन आम्ही अमरावती लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. युतीत नाही दिली तर अपक्ष आम्ही लढू, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
तर, विधानसभेसाठी राज्यात 15 ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे करू, शिंदे आणि भाजपचा फॉर्म्यूला ठरला असला तरी आम्हाला त्यात जागा मिळाल्या नाही तर आम्ही पंधराही जागी प्रहारचे अपक्ष उमेदवार उभे करून विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.