महाजनांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, सकाळपासून तोंड...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप होत आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. परंतु, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले होते. त्यावरच आता भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही. असा टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले तर यात एकनाथ शिंदेचा बचाव करण्याचा काय प्रश्न आला? असा सवाल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना केला. पुढे ते म्हणाले की, सकाळपासून तोंड मोकळा सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काही बोलायचं हा संजय राऊतांचा धंदा झाल्याची बोचरी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तर रोज सकाळी बातमी पाहिजे म्हणून ते काही बोलतात त्यामुळे संजय राऊत हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही. असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते राऊत?
आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रे गेली आहेत, दरम्यान शिंदे यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी केले आहे. सोबतच फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर देखील त्यांनी टीका केली होती. नागपुरातील भूखंड घोटाळ्यावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं.