अजित पवारांसोबतच्या 'त्या' गुप्त भेटीत भाजपची ऑफर? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले
मुंबई : शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील गुप्त भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. यामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. तर, विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांना ऑफर दिल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
गुप्त बैठकीमध्ये काही चर्चा नाही, भेट झाली नाही असं नाही, भेट झाली. कुटुंब प्रमुख म्हणून काही प्रश्न असेल तर माझा सल्ला घ्यायला येतात, मी बोलतो. बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही, माझ्यासोबत कोण चर्चा करणार, त्याला अधिक महत्त्व देण्याचे काम नाही. मी लपून गेलो नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या घरात लग्नाचे वातावरण आहे, त्यात मी कुटुंब प्रमुख म्हणून मला विचारतात, त्यात मी राजकारण आणणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भेटीत ऑफर देण्यात आली का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मी तर मोदींच्या विरोधात बोलत आहे. पुण्याचा कार्यक्रम आधीच ठरला होते. कार्यक्रमाचे आयोजन टिळक यांनी केले होते. आणि सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षाचे आहेत हे माहित आहे. मला विनंती करायला सांगितले मी केली आणि त्यांनी स्वीकारला. आम्ही भाजप संबंधित नाही, होणार नाही. २०२४ मधे देशातील आणि राज्यातील परिस्थितीत बदलली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत अस्ववस्था असून राष्ट्रवादीला सोडून निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून लढण्याची चर्चा आहे, पण ही चर्चाच आहे त्यात तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.