गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे कोण? बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
अमोल नांदुरकर | अकोला : जालन्यातील घटनेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेचा आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. गोवारी हत्याकांडाचा उल्लेख करत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे कोण, असा टोला बावनकुळेंनी शरद पवारांना लगावला आहे. अकोल्यात संवाद यात्रेदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार 100 मीटर चालून गेले असते तर नागपूर येथील गोवारी हत्याकांड घडलं नसतं, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सत्ता असताना शरद पवार कधी मराठा आरक्षणासाठी आग्रही राहिले नाही, असंही ते म्हणाले. नागपूरमधील गोवारी समाजच हत्याकांड झाल्यावरही पवार भेटायला गेले नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे कोण, असा टोला बावनकुळे यांनी शरद पवारांना लगावला आहे. तर, जालन्यात घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी मागणी बावनकुळे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, असं मतही बावनकुळेंनी व्यक्त केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनीही गोवारी हत्याकांडावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. मग त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा का दिला नाही, अशी टीका केली होती. यावर शरद पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले होते. 1994 म्हणजेच 28 ते 30 वर्षापूर्वी गोवारींचे प्रकरण झाले तेव्हा मी मुख्यमंत्री होतो पण नागपुरात नव्हतो. मी मुंबईत होतो. आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. मुंबईतील घटनेनंतर तेव्हाचे गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले होते.