मुख्यमंत्री शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर दानवेंची टीका; म्हणाले, सभेसाठी रेड कार्ड...
राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट वाद उफाळून असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पैसे देऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा आहे. मात्र, त्यासाठी रोहयो मंत्री संदीपान भुमरे गावोगावी जाऊन लोकांना येण्याची विनंती करत आहे. परंतु सभेसाठी नागरिकांकडून मंत्री भुमरे यांना प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका, आशासेविका यांना सभेला येण्याचे अधिकृत पत्र काढले आहे. राजकीय सभेसाठी शासकिय कर्मचारी यांचा वापर केला जातोय. लोकांना आणण्यासाठी रेट कार्ड सुरु करण्यात आला आहे. सभेला येण्यासाठी दीड हजार रुपये दिले जात असल्याची माहिती मला मिळाली असल्याचं दानवे म्हणाले आहे.
मंत्री भुमरेंच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन
नुकताच काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार मंत्री संदीपान भुमरे यांची त्यांच्याच पैठण मतदारसंघात सभा पार पडली होती. मात्र या सभेत नागरिकांकडून खासच प्रतिसाद मिळाला नाही. त्या ठिकाणी खूर्च्या रिकाम्या असल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता उद्या 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे.
शिंदे गटाचे दानवे यांना उत्तर
शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी उपयोग केला जात असल्याचा आरोप आमदास दानवे केल्यानंतर आता शिंदे गटाकडून त्यांना उत्तर देण्यात आले आहे.पत्राबाबत शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, सध्या एक पत्र व्हायरलं होत आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र हे पत्रक बनावट आहे. असं पत्र काढून व्हयरल करणे म्हणजे हा निवळ खोडसाळपणा आहे. दानवेंचा आरोप फेटाळून लावत हा बदनामी करण्याचा कट असल्याचे जिल्हाध्यक्ष जंजाळ सांगितले आहे.