शरद पवारांनी वाढवलं धनंजय मुंडेंचं टेन्शन! 'हा' नेता देणार बीडमध्ये लढत?
बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. अशातच, धनंजय मुंडे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शरद पवारांकडून निवडणुकीत धनंजय मुंडेंना पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार यांनी परळीमध्ये बबन गित्ते यांना बळ दिले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बबन गित्ते यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. त्याचपूर्वी बबन गित्ते यांनी परळीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत जवळपास एक हजार गाड्यांचा ताफा बीडच्या सभेकडे वळविला आहे. दरम्यान, आता मुंडे बहीण भावाच्या लढतीमध्ये गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून असणार आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात आता बबन गित्तेंच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झालाय. आणि त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार आहे.
दरम्यान, बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी ही बॅनर्स लावले आहेत. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत, असं त्यांनी सांगितले आहे. शरद पवार यांच्या सभेला 40 ते 45 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचे समजते.