बाबरी मशीदबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत; खडसेंकडून पाठराखण
जळगाव : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन चंद्रकांत पाटलांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. अशात, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली आहे. राम जन्मभूमी आंदोलनात शिवसैनिकांचा कमी संख्येत सहभाग असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले आहे. तसेच, शिवसेनेचे मंत्री सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. यामुळे वादाला फोडणी मिळाली असून मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
बाबरी मशीदबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत असल्याचे म्हणत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, राम जन्मभूमी आंदोलनात किती शिवसैनिक होते हा विचार करण्यासारखा विषय आहे. बाबरीचा ढाचा आम्ही पाडला हे म्हणण्याचं धैर्य भाजपमध्ये नव्हतं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी होय शिवसैनिकांनी बाबरी पाडली, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हंटले. दरम्यान, बाबरी मशीदच्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो व त्यावेळी 15 दिवस तुरुंगवासासह पोलिसांकडून मला मारहाण देखील झाली असल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर उध्दव ठाकरे यांनी घणाघात केला होता. काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. मिंधेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी उध्दव ठाकरेंनी केली होती.