शिवसेनेचा वर्धापन दिनी दोन कार्यक्रम; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा भिडणार

शिवसेनेचा वर्धापन दिनी दोन कार्यक्रम; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा भिडणार

शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहे.

मुंबई : शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा भिडणार आहेत. ठाकरे आणि शिंदेंकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि ठाकरे गटात बॅनर वॉर सुरु झाले आहे.

ठाकरे पक्षाचा 57 वा वर्धापन दिन आज षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6:30 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील सादर होणार आहे. कलानगरमध्ये ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. निष्ठावंतांचा कुटुंबसोहळा, शिवसेना परिवार जगावेगळा, असा आशय बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

तर, शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को मैदानावर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरूवात होईल. दीड तास सत्य परिस्थितीवर नाट्यांतर असेल, त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणं होतील. या कार्यक्रमासाठी आमदार, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण होईल. त्याचबरोबर ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते आहे. शिंदे गटाकडूनही बॅनर लावण्यात आले असून वाघांचा वारसा असा उल्लेख त्यावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com