...म्हणून नाना पटोलेंची तडफड; एकनाथ शिंदेंचा टोला
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसवले होते, असा मोठा आणि गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या आरोपाला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले यांना सध्या महाराष्ट्रात कोणी गांभीर्याने घेत नाही, म्हणून त्यांची तडफडत होत असल्याचा जोरदार टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, नाना पटोले यांना सध्या महाराष्ट्रात कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून नाना पटोले यांची तडफडत होत असून गंभीर आरोप केल्यास त्यांची दखल घेतली जाईल. नाना पटोले यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की मनोज जरांगे यांच्या उपोषणामागे एकनाथ शिंदे यांचा किंचित ही हात आहे का, असे आव्हानही त्यांनी केले आहे. मी पोटात एक आणि ओठात एक असं काम करत नही. मी सरळ मार्गी माणूस आहे. मनोज जरांगे यांनी माझ्या विनंतीला मान दिला, मराठा आरक्षण देणार हे सरकार आहे. इतर कोणत्याही समाजाला हानी न पोहोचवता अन्याय न करता मराठा आरक्षण मिळू शकत म्हणून हे उपोषण मागे घेतलं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला आरोप हा अतिशय खोटा, आम्ही अशाप्रकारे घाणेरडे राजकारण करणारे लोक नाहीत. आमच्या जे पोटात आहे तेच आमच्या ओठात आहे, दुसरा कोणतातरी आरोप करा म्हणावं, असा आरोप केल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी दाखला देण्यासाठी आक्षेप आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा कुठलाही विचार राज्याचा नाही. ओबीसींचे आरक्षण आहेत तेवढेच ठेवू. मराठा समाजाचे रद्द झालेल्या आरक्षण सुप्रीम कोर्टात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे गेले आहे. गेलेले आरक्षण मिळवून द्यायला सरकार कटीबद्ध आहे, यावर सरकारचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेला आहे, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेले होते हे आता सिद्ध झालेले आहे. १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफीही मागितली. दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.