बारसू रिफायनरीवरून पवारांचा सरकारला सल्ला; म्हणाले, स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे...
रत्नागिरी: बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध होताना दिसत आहे. त्यातच या स्थानिकांच्या विरोधात ठाकरे गटानेही सूर मिसळला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. याच भेटीनंतर शरद पवार यांनी ट्विट करत रिफायनरी प्रकल्पाबाबत भाष्य केले आहे.
काय म्हणाले शरद पवार ट्विट?
शरद पवार ट्विटमध्ये म्हणाले की, आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. या विषयाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्थानिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते हे पाहण्याची गरज आहे. यासाठी उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दाखवली. असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आले. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे. उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे. जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल. असा देखील सल्ला त्यांनी सरकारला दिला.