मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करणे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून अपेक्षित नव्हते- महेश तपासे
अमजद खान।कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून खासदार श्रीकांत शिंदे हे कामकाज करत असतानाच फोटो राष्ट्रवादीकडून आज शेअर करण्यात आला आहे. त्यावरच आता प्रचंड राजकारण तापलेलं दिसत आहे. यावरच आता राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले तपासे?
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, श्रीरामाच्या वनवासा दरम्यान सिंहासनावर जोडे ठेवून बंधू भरत याने राज्याचा कारभार केला इथे हिंदूत्व आणि श्रीरामाविषयी बोलणारे वडिल बाहेर असताना त्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करणे हे अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रात आणि देशात आपण कौटूंबिक गोष्टीत आपण कोणत्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण करता हा स्वभाविक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे.
खासदार शिंदे याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटो एका खर्चीवर बसून अधिकारी वर्गाशी चर्चा करीत आहे. त्यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा फलक आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी खासदारांच्या व्हीडीओवर त्यांची प्रतिक्रिया देताना खासदारांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या जनतेकडे दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली आहे.
कल्याण शीळ रस्त्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. यावर तपासे यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्यासाठी जमीन संपादीत केली गेली. त्यापैकी 150 जणांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. सर्व पक्षीय युवा मोर्चा बेमुदत उपोषणाला बसला आहे. त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असताना बारकाईने लक्ष घालणार असे आश्वासन दिले होते. त्यांना मोबदला मिळाला पाहिजे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.