राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का? नितेश राणेंचा खोचक सवाल
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिले, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी यांनी पलटवार केला आहे.
संसदेत काल अमित शहा यांचं ऐतिहासिक भाषण झालं. त्या भाषणाच्या मिरच्या विरोधी पक्षाला झोंबल्या. त्याचे परिणाम महाराष्ट्र राज्यात जाणवले. दुसर जे झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस, असे म्हणत नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी फ्लाईंग किस देत फिरत होते. एका महिला सदस्याला फ्लाईंग किस देणं कितपत योग्य आहे. ज्यांना महिला खासदारांना फ्लाईंग किस देणं योग्य वाटत त्याला काय म्हणायचं? राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
महिला अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार आज राज्यपालांना भेटणार आहेत. हा मोठा जोक आहे. त्या पत्रात डॉक्टर पाटकरचे नाव असणार का? संजय राऊतांना फार प्रेम कळतं. महिलांना अश्लील शिव्या घालतो. त्यांच्या घराबाहेर कुत्रे ठेवतो. अमित शहा यांच्या भाषणानंतर चिडचीड नेमकी कोणाची झाली हे आज सकाळच्या पत्रकार परिषदेत दिसली, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केलेल्या पत्रकाराला मारहाण झाली आहे. किशोर पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यावरुन राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, पत्रकार हल्ल्याबाबत संजय राऊतांना शिंदे व शिवसेना आमदारांवर टीका करण योग्य आहे का? तुमच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले, असा उलटप्रश्न त्यांनी राऊतांना केला आहे.