...तर ती भारत मातेशी बेईमानी होईल; संजय राऊत संसदेत कडाडले
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने चर्चेसाठी आणि मंजूरीसाठी दिल्ली अध्यादेश पटलावर ठेवला आहे. यासंबंधित विधेयकाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत कडाडून विरोध केला. या विधेयकाला पाठिंबा देणारे भारत मातेशी बेईमानी करतील, असे राऊतांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, मला या विधेयकाच्या कायदेशीर पैलूत जायचे नाही. चिदंबरम, डॉ. सिंघवी, देशाचे माजी सरन्यायाधीश, सर्वजण यावर बोलले आहेत. पण मी एवढेच म्हणेन की तुम्ही अतिशय धोकादायक विधेयक आणले आहे. या विधेयकाला माझा विरोध आहे. जे लोक या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करतील ते भारत मातेशी अप्रामाणिक असतील, भारताशी बेईमानी करतील. तसेच, देशाच्या संघीय रचनेवर हा थेट हल्ला आहे, लोकशाहीचा खून आहे, असे राऊतांनी म्हणताच सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. यावर संजय राऊतांनी माझ्याकडे चार मिनिटे आहे, मला दोनच मिनिटं पुरेशी आहेत तेव्हा आवाज खाली ठेवा, असे म्हंटले आहे.
दिल्लीत निवडून आलेले सरकार आहे, विधानसभा आहे. लोकांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना मतदान केले नाही. एलजीला मत दिले नाही, एलजी मत मागायला जात नाही, केजरीवाल किंवा कोणताही मुख्यमंत्री किंवा कोणतेही सरकार, कोणताही नेता मते मागतो. तुम्ही पाच वेळा निवडणूक हरलात, सहा वेळा हरलात, आजही दिल्ली विधानसभेत तुमचे पाच आमदार नाहीत आणि म्हणून तुम्हाला दिल्ली विधानसभा काबीज करायची आहे, मग ती महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू असो, अशी जोरदार टीकाही राऊतांनी मोदी सरकारवर केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगशी संबंधित केंद्राच्या अध्यादेशाची जागा घेण्यासाठी हे विधेयक वरिष्ठ सभागृहात आणण्यात आले आहे. याआधी गुरुवारी (३ ऑगस्ट) लोकसभेत ते मंजूर करण्यात आले.