राज यांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता? कोणी केली टीका?
मुंबई :उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची युतीबाबत राजकीय वर्तुळात अधूनमधून चर्चा होत असते. आता या दोघा ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती होण्याची चर्चा सुरु झालीय. याला कारण ठरलंय बाळासाहेबांचं स्मारक. ही चर्चा फोनवर होणार असली तरी राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नेते नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्विटरवरुन उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता, राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता? बाळासाहेबांच्या बाकी वशंजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता, असे खोचक सवाल नितेश राणेंनी उध्दव ठाकरेंना विचारले आहेत. आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अशी कपटी वृत्तीचा खऱ्या औरंग्या कोण, अशी टीका उध्दव ठाकरेंवर राणेंनी केली.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक तयार होत आहे. या राष्ट्रीय स्मारकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन पट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्माण करण्यात येत आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर म्हणजे १९६६ ते १९९० पर्यंतच्या कालावधीमधील दसरा मेळाव्यात केलेली भाषणं राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे यांनी ध्वनी मुद्रीत केली होती. हाच एतिहासीक ठेवा परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याची शक्यता आहे.