...तर त्यांच्यावर बुलडोझर चालेल; गडकरींनी कोणाला दिला इशारा?
कल्पना नळसकर | नागपूर : राजकारण्यांना फक्त आपल्या मुलाच्या रोजगाराची चिंता असते, असा निशाणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साधला आहे. नागपुरात भूमिपूजनाच्या वेळी नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. कंत्राटदारांनी वाईट काम केले तर त्यांच्यावर बुलडोझर चालेल, असा कडक इशाराही गडकरींनी दिला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, नेत्यांना आपल्या मुलाच्या रोजगाराची चिंता असते, अर्धे नेते यात असतात. नवरा म्हणतो बायकोला तिकीट, चमच्याला तिकीट द्या, ड्रायव्हरला तिकीट द्या. यांच्याकडे चौथं नाव नसत. आणि खूपच झालं तर म्हणतात आमच्या जातवाल्यांला तिकीट द्या. यामुळे मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलांची चिंता न करता दुसऱ्याच्या मुलांची काळजी करण्याचा निर्णय घेतला आहे. होय, देवेंद्रजींची मुलगी अजून लहान आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, कंत्राटदाराला निलंबित करा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. कंत्राटदारांनी आठवण ठेवा, त्यांनी वाईट काम केले तर त्यांच्यावर बुलडोझर धावेल, म्हणून चांगले काम करा, असे नितीन गडकरी यांनी ठणकावले आहे.
नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांचाही क्लास घेतला. ते म्हणाले की, सध्या पावसाळा आहे. नाले पूर्णपणे स्वच्छ झाले पाहिजेत. मी चार-पाच दिवस नागपुरातच राहणार आहे. दिवसभर पावसात फिरेन, पाऊस पडल्यावर कुठे पाणी साचले तर जनतेला घेऊन महापालिका आयुक्तांच्या दारात ठिय्या आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.