शरद पवारांना अजित पवार कन्फ्युज करतात, म्हणून...; विखे-पाटलांचा टोला

शरद पवारांना अजित पवार कन्फ्युज करतात, म्हणून...; विखे-पाटलांचा टोला

शरद पवार यांच्या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

सोलापूर : मविआ आज आहे, उद्या मात्र सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या विधानावरुन भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निशाणा साधला आहे. शरद पवारांना अजित पवार कन्फ्युज करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

शरद पवारांना अजित पवार कन्फ्युज करतात, म्हणून...; विखे-पाटलांचा टोला
'ठाण्यात दिघे कुटुंबात उद्धव ठाकरेंनी फूट पाडली'

अजित पवार मागील काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अजित पवारांनी त्या चर्चा फेटाळून लावत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. अशातच, शरद पवारांनी आज मविआ आज आहे, उद्या मात्र सांगता येणार नाही, असे सूचक विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. राजकारणात कन्फ्युज ठेवणं ही त्यांची हातोटी आहे. त्यांना आता अजित पवार कन्फ्युज करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडीची जी वज्रमूठ आहे त्या वज्रमुठीला तडे गेलेले आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे.

तर, मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यावरही राधाकृष्ण विखे-पाटलांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांचा मानसिक संतुलन ढासळलेले आहे. गेली चार महिने ते हेच सांगतात आज उद्या सरकार जाणार पंधरा दिवसांनी सरकार जाणार हे काय नवीन नाही. महाविकास आघाडीवाल्यांना मी नेहमी सांगतो भविष्यकरांची संख्या वाढत चालली आहे, असा निशाणाही विखे-पाटलांनी राऊतांवर साधला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीसंदर्भातील विधानावर शरद पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com