वेळात वेळ काढत मुख्यमंत्र्यांनी जवळपास ३१ दहीहंड्यांना भेट...; रोहित पवारांचा निशाणा
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 31 दहीहंडी मंडळाना भेट देत गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. यावरुनच राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वेळात वेळ काढून शेतकऱ्यांना तसेच आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना देखील धीर द्याल, असे त्यांनी म्हंटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, आपल्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढत आज मुख्यमंत्र्यांनी जवळपास ३१ दहीहंड्यांना भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवत आहेत. मुख्यमंत्र्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा.
राज्यात दुष्काळाने शेतकरी होरपळला असून यंदाचा कोरडवाहू खरीप हंगाम जवळपास पूर्णतः वाया गेला आहे. कदाचित आज उद्या पाउस पडेलही परंतु झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल आहे.
दुसरीकडे मराठा व धनगर आरक्षणसंदर्भात राज्यात वेगवेगळ्या भागात आंदोलने सुरु आहेत. अशा सर्व स्थितीत मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांना तसेच आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना देखील धीर द्याल ही माफक अपेक्षा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.