आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु...जरांगेंच्या तब्येतीबाबत रोहित पवार म्हणाले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी सोमवारी रात्री १२.३० पासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि निस्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा व कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी ही कळकळीची विनंती. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.