...पण गणपती मोदी सरकारला पावेल काय? संजय राऊतांचा खोचक सवाल
मुंबई : महाराष्ट्राने ‘इंडिया’च्या विजयाचे रणशिंग फुंकले. मुंबईतील बैठकीचे हेच फलित आहे. त्या बैठकीची धास्ती इतकी की पंतप्रधान मोदी यांनी ऐन गणपतीत पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून सनसनाटी निर्माण केली, पण गणपती त्यांना पावेल काय? कठीण आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला आहे. सामना रोखठोकमधून संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
संजय राऊत म्हणाले की, व्यापारी मित्राच्या खिशात राजा आहे व राजा स्वत:ला फकीर म्हणून मिरवतो. त्या फकिरीचे ढोंग उघडे पडत आहे. 2024 च्या निवडणुका इंडिया आघाडी जिंकेल. हे आता नक्की. गुजरातच्या भूमीवरून जे घाणेरडे राजकारण दोन नेत्यांनी केले, त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही सर्वच धोक्यात आले. महात्मा गांधींची ही भूमी असे सांगायलाही आता जीभ धजावत नाही. महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी गुजरात सोडून महाराष्ट्रात व नंतर चंपारण्य व दिल्लीत गेले, पण त्यांचे मत पक्के होते. गुजरातच्या व्यापार मंडळात राहून स्वातंत्र्याचा लढा लढता येणार नाही. या मातीत व रक्तात व्यापार आहे. व्यापारी प्रजेला व्यापारी राजा मिळाला, पण संपूर्ण देश म्हणजे गुजरातचा व्यापार नाही.
काँग्रेस पक्षाची देशभरातील स्थिती कमालीची सुधारते आहे, पण स्वबळावर दीडशे जागा जिंकण्याइतपत ती सुधारलेली नाही. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडी हाच सध्याच्या भारतीय जनता पक्षाला पर्याय ठरेल. याचे कारण असे की, स्वत: मोदी यांचा चेहरा भाजपला स्वत:चे बहुमताचे सरकार बनवून देईल अशा स्थितीत नाही. भाजप दोनशे पार करणार नाही व त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्र लागतील. ते मित्रही त्यांना मिळणार नाहीत. बुडत्या जहाजातून त्यांचे स्वत:चेच लोक निघून जातील असे स्पष्ट चित्र आज आहे. भाजपातच आज असलेल्या हुकूमशाहीविरोधातील खदखद उसळून बाहेर येईल, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.
मुंबईत इंडिया बैठकीवरचे लक्ष उडावे म्हणून दिल्लीतील विशेष संसद अधिवेशनाची घोषणा झाली. त्यामुळे राजकीय गोंधळ उडेल व इंडिया बैठकीच्या बातम्या झाकोळून जातील असे भाजपच्या चाणक्यांना वाटले. तसे काहीच घडले नाही. ऐन गणपती उत्सवात संसदेचे अधिवेशन घेणे हा महाराष्ट्रातील गणेशभक्तांच्या भावनेशी खेळ आहे. त्यापेक्षा नवरात्रीत अधिवेशन घेतले असते तर बरे झाले असते, पण तसे केले तर गुजरातची जनता नाराज होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना तुडवल्या तरी आता चालू शकते या विचारांचे सरकार दिल्लीत बसले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी मोदी कार्याची ‘वरात’ काढतील व 2024 च्या आधीच सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करतील. महाराष्ट्राने ‘इंडिया’साठी रणशिंग फुंकले आहे, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे