पंतप्रधान मोदींच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर शरद पवारांचा टोला; फडणवीसांचा आदर्श...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. त्यात त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा येणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे 'भविष्यवाणी' म्हणून याकडे पाहिले जात आहे. या विधानाचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समाचार घेतला आहे.
आज नॉर्थ-ईस्ट हा संवेदनशील भाग आहे, चीनची सीमा असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अनेक गोष्टी घडवल्या जातात त्या ऐक्याच्या दृष्टीने घातक आहेत. एकमेकांवर हल्ले होत आहेत. नव्वद दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र पंतप्रधान आणि हाऊसमध्ये फक्त तीन मिनिट बोलले, आणि इतर विषयांवर विरोधकांवर बोलत अविश्वास ठरावावर बोलले.
याचा अनेक राज्यांवर परिणाम होणार आहे, पंतप्रधानांनी स्वतः जाऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे मात्र हे निवडून प्रचार करत आहेत. महिलांचे धिंडवडे काढत असताना मोदी बघ्याची भूमिका घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
दिल्लीत भाषण करताना ते उल्लेख करतील असं वाटत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेतला असा दिसते आणि मी पुन्हा येईल असं म्हणाले. नॉर्थ-ईस्टमध्ये काय चालले यापेक्षा मी पुन्हा येईल हे महत्त्वाचे वाटले, असा निशाणा त्यांनी पंतप्रधान मोदींवर साधला आहे.
आताचे वातावरण मोदींना अनुकूल नाही. देशात अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे का? लोकांनी यांची विल्हेवाट कशी लावायची हे ठरवलं आहे. ते निवणुकीत दिसेल. हे पुन्हा येईल म्हणतात मात्र फडणवीस सारखं होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, अनेक राज्यात सरकार पाडले, गोवामध्ये जनाधार नव्हता, मध्यप्रदेशमध्ये सरकार पाडले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काय झालं त्याची विल्हेवाट लावली सर्वांना माहित आहे. वीस जिल्ह्यांमध्ये कायद्यांचा वापर करत धमकी देऊन जेलमध्ये टाकले. विरोधकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. मात्र आम्ही संघर्ष करू आणि पुन्हा उभा आहे. यांना लोकशाही मार्गानें उत्तर देऊ, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.