शिंदे गटाची 'ही' महत्वाची खाती अजित पवार गटाला; नाराजीनाट्य रंगणार?
मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटपावरुन बैठकांचे सत्र सुरु होते. यादरम्यान शिंदे गटातील मंत्र्यांनी राष्ट्रवादीवरुन नाराजी व्यक्त केली होती. यामुळे खातेवाटपास विलंब होत होता. परंतु, आज अखेर खातेवाटपाचा तिढा सुटलेला आहे. यामध्ये केवळ भाजप कोट्यातून पदे देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु, खातेवाटपाच्या यादीमध्ये शिंदे मंत्र्यांचीही काही खाती अजित पवार गटाला देण्यात आली आहे. यामुळे आता राजकारणात नाराजीनाट्य रंगणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिंदे गटाची 'ही' खाती अजित पवार गटाला
कृषी खाते
कृषी खाते हे अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. परंतु, नव्या खातेवाटपानुसार कृषी मंत्रिपदी आता धनंजय मुंडे यांना मिळालेले आहे. तर, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक, विकास आणि पणन खाते मिळाले आहे.
अन्न व औषध प्रशासन
हे खाते आधी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. हे खाते आता अजित पवार गटाचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांना देण्यात आलेले आहे. तर, संजय राठोड यांना मृद व जलसंधारण खाते दिले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या शपथविधीनंतर खातेवाटपाच्या हालाचाली सुरु झाल्या होत्या. यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. अजित पवार वजनदार खात्यांसाठी आणि अर्थमंत्री पदासाठी आग्रही होते. परंतु, अर्थ खाते अजित पवारांना देण्यास शिंदे गटातील नेत्यांचा विरोध होता. अखेर ही नाराजी दुर करण्यास एकनाथ शिंदे यांना यश आले असून अजित पवार अर्थमंत्री पदी विराजमान झाले आहेत.