महाराष्ट्र डायरी ऑफ खोका चित्रपट काढणार; राऊतांच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचे प्रत्युत्तर, म्हणाले..
नांदेड : मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यांच्यावर लवकरच महाराष्ट्र डायरी ऑफ खोका हा चित्रपट काढणार असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. यावर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट गाणे काय काढायचे ते काढू द्या, लोक त्यांना जागा दाखवतील, अशी जोरदार टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात पाळलेले. ते कधीही कोंबड्या कापल्या जातात. सकाळ संध्याकाळ कोंबड्या आरवतच असतात. तसे ते करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? त्यांच्यावर लवकरच महाराष्ट्र डायरी ऑफ खोका हा चित्रपट काढणार, असे संजय राऊत म्हणाले होते.
यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. आम्हाला आमची काम करायची आहेत. चिखलामध्ये दगड मारला तो आपल्या अंगावर उडतो. त्यांना चित्रपट गाणे काय काढायचे ते काढू द्या लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही पलटवार केला होता. मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत. संजय राऊत बिनबुडाचा गाडगं आहे. कुठे पण गरगळत आहे. आम्ही पण एक चित्रपट काढणार आहे माकडाच्या हातात कोलीत, असा टोला शहाजी बापू पाटलांनी राऊतांना लगावला होता.