भास्कर जाधवांचा शिवसेनेवर घणाघात; म्हणाले, गद्दार प्रवृत्ती उद्याच्या होळी...
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर पहिली सभा होणार आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी याच सभेत बोलत असताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार फटकेबाजी केली.
काय म्हणाले भास्कर जाधव?
खेड येथील सभेत उपस्थितांना संबोधित करताना भास्कर जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरे आज आघात झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर पडले आणि ते कोकणात आले आहेत. झालेल्या आघाताचा बदला घ्यायाचा असेल तर उद्धव ठाकरेंचा विश्वास देखील माझ्या कोकणावरच दिसतोय. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. शिवसेना प्रमुखांनी आमचा सन्मान केला आम्हाला प्रतिष्ठा पद आणि सत्ता मिळवून दिली आहे. काही लोकांनी शिवसेनेचा विचार मातीत मिळवायचा विचार केला असेल तरी शिमग्याच्या सणाच्या दिवशी अशा प्रकारची गद्दार प्रवृत्ती उद्याच्या होळीच्या सणात जाळून पुन्हा शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पक्ष प्रमुखांना दिल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कमद भंपक आहेत. त्यांनी मतदार संघात काहीच विकास केला नाही. रामदास कदम म्हणजे तात्या विंचू आहेत. त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा थेट इशारा त्यांनी दिला.