Maharashtra Police Transfer : महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल करत पोलीस यंत्रणेतील एकूण 132 अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यामध्ये 51 आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) आणि 81 राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांचा उद्देश पोलीस व्यवस्थेला अधिक सक्षम बनवणे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणावर अधिक प्रभावी कारवाई करणे हा आहे. या फेरबदलांत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथे कार्यरत असलेल्या शस्त्र तपासणी शाखेच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना एसआरपीएफ गट 1, पुणे येथे कमांडर म्हणून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, ठाणे शहरात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले महेंद्र पंडित यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे.
पुण्यातील वाहतूक विभागाचे डीसीपी अमोल झेंडे यांना दौंडच्या एसआरपीएफ गटात कमांडर पदावर नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, डीसीपी स्मार्तना पाटील यांची बदली खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांना मुंबईत डीसीपीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबई पोलीस दलात डीसीपी म्हणून नवीन नियुक्त्या मिळाल्या आहेत. यामुळे एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांची मुंबईत बढती झाली आहे.
गृह विभागाच्या या निर्णयामुळे, राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच आणखी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. या बदल्यांमुळे संपूर्ण राज्यात पोलीस यंत्रणा अधिक परिणामकारक व गतिमान होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.