वज्रमूठ सभेला प्रतिसाद नव्हता,बाहेरून माणसं आणली; इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावरच आता संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, "वज्रमूठ सभेला प्रतिसाद दिसत नव्हता, सभेसाठी बाहेरून लोकं आणली होती. महानगर पालिकेत त्यांची इतकी वर्षे सत्ता होती पण आपण पाणी लोकांना देऊ शकलो नाही. शहराला तुम्ही नवीन नावे देवून गेलेले आहात. तुम्ही वारंवार जे मुद्दे काढता, लोकं त्रस्त झालेले आहेत. लोकांना रोजगार पाहिजे, पाणी पाहिजे. चांगले रस्ते पाहिजे," असे जलील म्हणाले.
दरम्यान, सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपाचं म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललंय. देशभरातली भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा. असे ते म्हणाले. तसेच मविआच्या सर्वच नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.