MPSC परिक्षांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; गैरप्रकारांच्या मालिकेनंतर आयोगाचे निर्णय
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेला आता सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पेपर फुटीची प्रकरणं लक्षात घेता आयोगाने हा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेवर देखरेख करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान तसेच परीक्षेनंतरच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यात उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
परीक्षेकरिता नियुक्त कर्मचारी आणि आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. एमपीएससी परीक्षेत आतापर्यंत झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक महिने स्पर्धा परिक्षा प्रलंबित पडलेल्या होत्या. त्यानंतरही ज्या परिक्षा घेण्यात आल्या, त्यामध्ये वेगवेगळे गैरप्रकार पाहायला मिळाले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला होता. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

