CM शिंदेंच्या भेटीला 'निहार'; ठाकरे कुटुंबातला आणखी एक चेहरा राजकारणात येणार?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील चाळीस आमदार घेऊन बंड केलं अन् राज्यात मोठी उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झालं. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मैदानावर उतरुन पुन्हा एकदा पक्ष बांधण्यासाठी धडपड सुरु केली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी त्यापेक्षा दुप्पट वेगाने शिवसेना आणि इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करण्यासाठी ताकद पनाला लावली आहे. त्यातच आता एकट्या पडलेल्या उद्धव ठाकरेंचे बंधू बिंदुमाधव ठाकरेंचा मुलगा निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनीही आज एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यानंतर आता निहार ठाकरे हे नवं नाव आता महाराष्ट्राच्या राजकारणात येणार असल्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
निहार ठाकरे हे आज स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. एकनाथ शिंदे यांना माझा पाठिंबा आहे. पक्षाला लागणाऱ्या लीगल गोष्टींसाठी त्यांना मदत करण्यासाठी मी इच्छुक आहे. मी आपल्याच पक्षाच्या नेत्याला भेटायला गेलो होतो असं निहार ठाकरे यांनी सांगितलं. न्यायलयाच्या निर्णयानंतर पुढचा निर्णय घेऊ असं म्हणत खरी शिवसेना ती जी बाळासाहेबांचे विचार पुढे नेईल असं निहार ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेला असे चॅलेंजेस नवीन नाही. पक्षाची लिगल फर्म असते. ती मदत मी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, बाळासाहेबांचे विचार शिंदे पुढे नेतील असा विश्वास आपल्याला असल्याचं निहार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, याबद्दल बोलताना किरण पावसकर म्हणाले, निहार ठाकरे हे शिंदे गटासाठील कायदे विषयक बाजू संभाळणार आहेत. शिवसेना प्रमुख यांचे काम पुढे नेण्यासाठी शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तरुणांसाठी पुढे येऊन काम करण्याची इच्छा निहार यांनी बोलून दाखवली आहे. मी पहिला असा माणूस बघतोय जो माझा वडिलाचा फोटो वापरू नका असं बोलतोय असं म्हणत किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवरन निशाणा साधला.