"अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही" जयंत पाटील

"अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही" जयंत पाटील

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे.
Published by :
shweta walge

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत आले आहे. काल मंत्री सत्तार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यावरुनच अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्रीमंडळात असणार्‍या अशा जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणाऱ्या एका महिला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे ते म्हणाले, अब्दुल सत्तार यांची ही भाषा पहिलीच नाही, यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दारु पिता का? असा प्रश्न विचारला होता. आता एखाद्या महिलेबाबत बोलणे, त्या संसदेत अतिशय पोटतिडकीने बोलतात. त्यांच्याबाबत बोलणे ही तर हद्दच झाली आहे. मंत्र्यांनी काही मर्यादा सांभाळायच्या असतात परंतु या मर्यादांचा वारंवार हे मंत्री उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यपाल हे सर्वोच्च आहेत. सरकार ऐकत नसेल तर त्यांना आम्ही कैफियत मांडू शकतो. हा विषय माफी मागून संपणार नाही. हवे ते विधान करता मग माफी मागता हे महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारमधील लोकांनी विचार करावा, त्यांना आपले सहकारी कसे हवेत. अब्दुल सत्तार यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही. मंत्री आहेत म्हणून पोलीस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, सरकारे येतात आणि सरकारे जात असतात असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळेस केले आहे.

या सरकारमधील मंत्र्यांची महिलांविषयी काय भूमिका आहे, महिलांचा द्वेष कशापद्धतीने करतात, यांचा महिलाविषयी काय विचार आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारमधील मंत्री कसे असावेत याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा आणि मंत्र्याने जे वक्तव्य केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? असा सवाल करतानाच मंत्र्यांची ही भूमिका भाजपला मान्य असेल तर बडतर्फ करणार नाही आणि मान्य नसेल तर धाडसाने सरकार येत जात असतात त्यामुळे कुणाकुणाला पदरात घ्यायचे व कुणाची ओझी उचलायची हे एकदा भाजपने ठरवले पाहिजे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

"अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही" जयंत पाटील
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com