PM Narendra Modi : '...म्हणून ट्रम्प यांचं निमंत्रण मी नम्रपणे नाकारलं'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं खर कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ओडिशातील भुवनेश्वर येथील जाहीर सभेत आपल्या नेतृत्वाचा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा प्रभावी ठसा उमटवला. अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निमंत्रण नम्रपणे नाकारल्याचा उल्लेख करत मोदींनी देशप्रेमाचे आणि कर्तव्यभावनेचे उत्तम उदाहरण सादर केले. "फक्त दोन दिवसांपूर्वी मी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात होतो. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला फोन केला व वॉशिंग्टनमध्ये येण्याचे आग्रहाने आमंत्रण दिले. मात्र, महाप्रभू जगन्नाथाच्या भूमीला भेट देणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे," असे सांगत त्यांनी आपल्या श्रद्धेची आणि कार्यनिष्ठेची प्रचीती दिली.
काँग्रेसच्या विकास मॉडेलवर तीव्र टीका
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या दीर्घकालीन कारभारावर कठोर टीका केली. "स्वातंत्र्यानंतर अनेक दशके देशाने काँग्रेस मॉडेल अनुभवले. या काळात सुशासनाचा अभाव होता, विकास प्रकल्प रखडले, लोकांचे जीवन सुलभ झाले नाही. भ्रष्टाचार, दिशाभूल आणि प्रकल्प अडवणे हे काँग्रेसच्या विकास मॉडेलची ओळख बनले," असे मोदी म्हणाले. त्याउलट, भाजप सरकारने देशात विकासाचे नवीन पर्व सुरू केले असून अनेक राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपला संधी मिळाल्यानंतर प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
पूर्व भारतात विकासाची नवी दिशा
पूर्व भारतातील बदलांवर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले, "आसाममध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अतिरेकी कारवायांना आळा बसला आहे. आसाम आता विकासाच्या मार्गावर वेगाने आगेकूच करत आहे. त्रिपुरामध्येही दीर्घ डाव्या राजवटीनंतर भाजपने स्थिरता व विकासाचा मार्ग सुरू केला आहे. हिंसाचार व भ्रष्टाचाराने त्रस्त असलेले त्रिपुरा आता शांतता व प्रगतीचे उदाहरण बनले आहे."
आदिवासी विकासासाठी ऐतिहासिक पावले
पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली. "आदिवासी मित्रांच्या स्वप्नांची पूर्तता करणे हे आमच्या सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे," असे सांगून त्यांनी 'धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'पीएम जन-मान योजना' या दोन ऐतिहासिक योजनांची माहिती दिली. 60 हजाराहून अधिक आदिवासी गावांमध्ये विकास कामे सुरू असून या योजनांवर 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च केला जात आहे. बिरसा मुंडा यांच्या नावावर असलेल्या या अभियानामुळे आदिवासींना घरे, रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा दिल्या जात आहेत.
ओडिशातील आदिवासींसाठी विशेष प्रयत्न
ओडिशातील 11 जिल्ह्यांमध्ये ४० निवासी शाळा उभारल्या जात असून केंद्र सरकार या प्रकल्पांवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च करत आहे. 'पीएम जन-मान योजना' साठी ओडिशाच्या कन्या आणि देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रेरणा दिली असल्याचे मोदींनी गौरवाने सांगितले.
"विकासाची ही गती थांबणार नाही"
आपल्या भाषणाचा शेवट करताना मोदी म्हणाले, "देशात स्थिरता असल्यास विकासाला गती मिळते. गेल्या दशकातील बदल ही त्याचीच साक्ष आहे. भाजप सरकारचा विकासाचा हा प्रवास अशाच निर्धाराने पुढे सुरू राहील."