Dhurandhar Film : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटात ‘राहुल गांधी’ नाव पाहून गोंधळ; जाणून 'घ्या' Fact Check
रणवीर सिंहचा नवा चित्रपट ‘धुरंधर’ लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. टीझरच्या शेवटी दाखवलेल्या नावांच्या यादीमध्ये ‘राहुल गांधी’ हे नाव पाहून अनेक प्रेक्षक चकित झाले. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा या चित्रपटाशी काही संबंध आहे का?, पण खरं तर या गोंधळामागे नावाची फक्त समानता आहे.
या चित्रपटात दाखवलेला राहुल गांधी हा काँग्रेसचा नेता नसून चित्रपटाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे. केवळ नाव एकसारखं असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
फिल्म इंडस्ट्रीतील अनुभव
‘धुरंधर’ चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर असलेले राहुल गांधी हे नावाजलेले चित्रपट व्यावसायिक आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक प्रसिद्ध प्रकल्पांवर काम केले आहे. 'द फॅमिली मॅन', 'फर्जी', 'रॉकेट बॉईज', 'मुंबई डायरीज' अशा लोकप्रिय वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये त्यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहिलं आहे.
‘धुरंधर’ चित्रपटामध्येही त्यांचं महत्त्वाच योगदान आहे. म्हणून टीझरमध्ये त्यांचे नाव झळकले आहे. टीझरच्या शेवटी विविध कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे झळकली. त्यात ‘राहुल गांधी’ हे नाव दिसताच काही प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आणि सोशल मीडियावर या नावाबद्दल चर्चा सुरू झाली. काहींनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी खरोखरच राजकीय राहुल गांधी यांचा यात संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
पण प्रत्यक्षात 'धुरंधर' मध्ये काम करणारे राहुल गांधी हे फिल्म इंडस्ट्रीतले व्यावसायिक असून राजकारणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. अशा नावाच्या समानतेमुळे गोंधळ होणे सामान्य गोष्ट आहे. यापूर्वीही अनेक वेळा कलाकार किंवा तंत्रज्ञ यांच्या नावांमुळे गोंधळ झाला आहेत.